जालना |(तालुका घनसावंगी प्रतिनिधी राहुल बोबडे)
जाफराबाद तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळू माफियांवर धडक मोहीम राबवली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संघू यांच्या कडक आदेशानंतर जाफराबाद पोलिसांनी विशेष पथक तयार करून अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली आहे.
माहितीनुसार, जाफराबाद परिसरात काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होता. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अचानक छापेमारी करत संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी काही वाहनधारकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी काही वाहने ताब्यात घेतली असून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संघू यांनी अवैध व्यवसाय, गुन्हेगारी आणि कायदा मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करत अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























