(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
शिवगर्जना, पालखी मिरवणूक आणि मर्दानी खेळांद्वारे विद्यार्थ्यांचे शिवरायांना अभिवादन
पुणे : सनई-चौघड्यांचे मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद आणि भगव्या पताकांच्या साक्षीने ‘एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवराय’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याजवळ कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर राजे निंबाळकर, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीतील नागरिक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील कविता, पोवाडे आणि शिवगर्जना सादर केल्या. तसेच सांस्कृतिक नृत्य, मर्दानी खेळ आणि मैदानी प्रात्यक्षिकांनी वातावरण भारावून गेले. शिवरायांच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर क्रेनद्वारे अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.
यावेळी प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे उर्जेचा महान स्रोत आहेत. जीवनातील संकटांवर मार्ग शोधण्यासाठी शिवचरित्र प्रेरणादायी ठरते. शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करणे हीच खरी शिवजयंती असल्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
चौकट : रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर आणि गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात १७० हून अधिक दात्यांनी सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला. विद्यापीठाच्या नवीन आयटी इमारतीच्या प्रवेशद्वारावर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक उपक्रमांद्वारे शिवजयंती साजरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे नागरिकांनी कौतुक केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























