पुरंदर : प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुरंदर तालुक्यातील आंबोडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांच्या जमिनीतून बेकायदेशीररित्या रस्ता मंजूर केल्याच्या आदेशाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले असून, आज आंदोलनाचा नववा दिवस आहे. मात्र उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी या आंदोलनाची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.
पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत व सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे यांनी आर्थिक तडजोडीतून संगनमताने कायदा पायदळी तुडवून, मूळ शेतकरी किंवा गावचा रहिवासी नसलेल्या उद्योजक अन्वर शेख यांना महारवतन धारक शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता मंजूर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सदर आदेश तात्काळ रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
बाधित गट क्रमांक १३१ हा वनक्षेत्र आरक्षित असताना तसेच अन्य हक्कात ग्रामपंचायत आंबोडीचे नाव असताना, ग्रामपंचायत व वनविभागास कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. तसेच रस्ता मागणी अर्जात कुंभारवळण–आंबोडी शिवरस्त्याचा उल्लेख असतानाही, कुंभारवळण गावाचे सातबारा उतारे जोडले गेले नाहीत, ही बाब मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सादर केलेल्या अहवालात नमूद केली नसल्याचा आरोप आहे.
अर्ज फेटाळण्यास पात्र असतानाही तहसीलदार विक्रम राजपूत यांनी पीडित शेतकऱ्यांना नोटीस न देता व स्थानिकांचा अर्ज नसताना पदाचा गैरवापर करून चुकीचा आदेश दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या आदेशामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, त्यामुळे गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तहसीलदार विक्रम राजपूत व मंडल अधिकारी सुहास कांबळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते शेतकरी प्रकाश रणपिसे, चंद्रकांत रणपिसे व अशोक रणपिसे यांनी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























