पुणे |(प्रतिनिधी रविदास कदम)
शाळा सोडल्याचा दाखला (LC) आणि मार्कशीट देताना विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे फी आकारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने पालकवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट देताना कोणतीही फी अथवा अतिरिक्त रक्कम आकारू नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्रमांक व1/शिसमासंकीर्ण/2025/ए1/विद्या शाखा/2977, दिनांक 5 जून 2025 नुसार, शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका देणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असून, त्यासाठी कोणतीही “हायोद्य”, सेवा शुल्क किंवा अन्य कोणत्याही प्रकारची फी आकारणे पूर्णतः बेकायदेशीर आहे.
आळंदी येथील श्री. अर्जुन मेदनकर अध्यक्ष.आळंदी जनहित फाउंडेशन यांनी या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे लेखी निवेदन सादर केले होते. त्यानंतर पुणे अहिल्यानगर सोलापूर.जिल्हा प्राप्त झालेल्या पालकांच्या तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,
👉 शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट देणे ही शाळेची जबाबदारी आहे
👉 या कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारता येणार नाही
👉 आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल
हा आदेश सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना लागू असून, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), मध्यवर्ती इमारत, पुणे यांच्या वतीने तो जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनेक पालकांची होणारी आर्थिक लूट थांबणार असून, पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, भविष्यात शाळांकडून अन्यायकारक फी आकारली गेल्यास तक्रार करण्यासाठी पालकांना अधिक बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























