बातमी रवि कदम/:
आळंदी : आळंदी हे संत परंपरेचे आणि वारकरी संस्कृतीचे पवित्र केंद्र असून या शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक उपाययोजना राबवण्यात येतील, असा ठाम निर्धार नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केला. आळंदी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
नगराध्यक्ष प्रशांत दादा.कुऱ्हाडे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, भूमिगत गटारे, आरोग्य सुविधा तसेच पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुधारणा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आणि इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. आळंदीतील शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा नगरपरिषदेचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पदग्रहण समारंभास शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱ्हेकर, डॉ. नारायण महाराज जाधव, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त मंडळ, कृष्णा खोरेचे अध्यक्ष रामशेठ गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश दादा वाडेकर, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर बबनराव कुऱ्हाडे डी डी भोसले पाटील, आजी-माजी पदाधिकारी उद्योजक,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन दिव्यांग भगिनींच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, समतेचा संदेश आणि सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आळंदीचा विकास करताना तिची अध्यात्मिक ओळख जपली पाहिजे. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देईल. शासनाच्या विविध योजनांमधून आळंदीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
समारंभाच्या शेवटी शहराच्या सर्वांगीण, भाविक-केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
% कार्यक्रमाची सांगता अवधूत गांधी यांनी माऊलीच्या पसायदानाने केली. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























