ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे यांना राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान
आळंदी (रवी कदम) :
तीर्थक्षेत्र आळंदी येथील नर्मदा परिक्रमा परिवाराचे मार्गदर्शक, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे यांना राष्ट्रीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या शुभ संकल्पनेने व सद्गुरु राजाराम महाराज शास्त्री, झेंडूजी महाराज परंपरेच्या कृपेने हा सन्मान छत्रपती शाहू महाराज सभागृह, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार असून गेल्या ४० वर्षांपासून ते कीर्तन, प्रवचन, भजन, काकडा, गायन व मृदंग वादनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी शेकडो कीर्तन व प्रवचनांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक मूल्यांची जपणूक करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आळंदी पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ते सामाजिक भान जपणारे, प्रभावी कीर्तनकार म्हणून ओळखले जातात.
महाराष्ट्राची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श वारकरी संप्रदाय भूषण पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात आले.
ह. भ. प. दिलीप महाराज ठाकरे हे आळंदी जनहित फाउंडेशनचे मार्गदर्शक असून त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आळंदीच्या वैभवात भर पडली आहे. या यशाबद्दल आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी फाउंडेशनतर्फे त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























