,(प्रतिनिधी : रविदास कदम )
चाकण शहर आणि MIDC परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा उघडपणे काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ऑनलाईन बुकिंग करूनही सामान्य नागरिकांना अनेक दिवस गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र दुसरीकडे काही दलालांकडून हेच सिलेंडर तिप्पट दराने तात्काळ उपलब्ध होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
घरगुती स्वयंपाकासाठी गॅसची अत्यंत गरज असताना महिलांना आणि कुटुंबांना एजन्सीकडून “सिलेंडर उपलब्ध नाही” असे सांगितले जात आहे. परंतु काळ्या बाजारात तेच सिलेंडर सहज मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांचा प्रश्न आहे की,
जर एजन्सीकडे गॅस उपलब्ध नाही, तर दलालांकडे हे सिलेंडर कसे पोहोचतात?
काही ठिकाणी ग्राहकांकडून सिलेंडर मिळवण्यासाठी शेकडो रुपयांची जादा वसुली केली जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. याचा सर्वाधिक फटका गरीब आणि कामगार वर्गाला बसत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
प्रशासनावर नागरिकांचे गंभीर प्रश्न
ऑनलाईन बुकिंग करूनही गॅस सिलेंडर का मिळत नाही?
काळ्या बाजारात सिलेंडर कोण पुरवत आहे?
एजन्सी किंवा डिलिव्हरी साखळीत कोणाचा हात आहे का?
पोलीस आणि अन्न-पुरवठा विभाग कारवाई का करत नाही?
नागरिकांचा आरोप आहे की, प्रशासनाने तात्काळ छापे टाकून दोषींवर कडक कारवाई केली नाही तर हा काळाबाजार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चाकणमध्ये सुरू असलेल्या या गॅस माफियावर प्रशासन कधी लगाम घालणार? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























