श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकीचे जतन
सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग, लोहगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर २०२५-२६ ची सांगता वढू खुर्द गावात विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात झाली. शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच महेंद्र खांदवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, तर सांगता समारंभात जनजागृतीपर कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.
या सात दिवसीय शिबिरात “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व पडीकक्षेत्र व्यवस्थापन” या संकल्पनेअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले. वढू खुर्द डोंगर पायथ्यालगत सलग समपातळी चर, वनराई बंधारे उभारणी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत परिसर, स्मशानभूमी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सार्वजनिक व्यायामशाळा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
याशिवाय नदी स्वच्छता अभियान, रस्त्यालगत वृक्षारोपण, लोकसंख्या जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान, हुंडा प्रतिबंध अभियान, निसर्ग संवर्धन, प्रभात फेरी व भित्तीचित्रणाद्वारे जनजागृती, सर्व शिक्षा अभियान अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांनी गावकऱ्यांचा सहभाग वाढवला.
शिबिरादरम्यान अजिंक्य डी वाय पाटील समूहाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ बी. खेडकर यांनी व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नाना शेजवळ यांनी शाश्वत विकास विषयावर विचार मांडले. मॉडर्न औषधशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. रोहित गुरव यांनी प्रेम, मैत्री व कुटुंबमूल्यांवर भाष्य केले. जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी जलसंवर्धन अभियानाबाबत प्रबोधन केले.
महाविद्यालयातील विभागप्रमुख व प्राध्यापकांनी स्वयंसेवकांना सातत्याने मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढविला. प्राचार्य डॉ. फारुख सय्यद व कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. कमलजीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडले. समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविल्याबद्दल सल्लागार डॉ. सुशांत पाटील व उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप बाळासाहेब घुले, शिक्षक प्रतिनिधी प्रा. श्रद्धा खंदारे, प्रा. अमृता मोरे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी उत्कर्ष पाटील, अनिकेत गायकवाड व इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले.
विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर सामाजिक बांधिलकी जपत उत्साही व आनंदी वातावरणात पार पडले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























