प्रतिनिधी अशोक कुंभार
वाई (जिल्हा सातारा): दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो आहे, तसतसा वाई तालुका आणि परिसरातील बाजारपेठा उत्साहाने सजू लागल्या आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ, पेठ परिसर, बसस्थानक परिसर, तसेच उपनगरांमध्ये विविध सजावटीच्या वस्तू, फटाके, मिठाई, आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
व्यापाऱ्यांनी दुकानांना रंगीत लाइट्स, रांगोळ्या आणि पारंपरिक सजावट करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी “दिवाळी सेल” आणि विशेष ऑफर्स सुरू करण्यात आल्या असून महिलांपासून तरुण वर्गापर्यंत सर्वजण खरेदीचा आनंद घेताना दिसत आहेत.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “गत काही वर्षांपासून मंदी आणि पावसाच्या अडचणींमुळे बाजारपेठेत थोडा ओहोटीचा माहोल होता, पण यंदा वातावरण उत्साहवर्धक आहे.”
दिवाळी निमित्ताने वाई शहरात प्रकाशझोतात न्हाऊन निघालेल्या रस्त्यांवर रंगीबेरंगी दिवे, पारंपरिक फुलबाज्या आणि दीपमाळा या सर्वांनी एक वेगळीच शोभा निर्माण केली आहे.
स्थानिक प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजारपेठांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला असून, नागरिकांना शांततेत आणि सुरक्षिततेत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केल आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























