!
तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) प्रतिनिधी राहुल बोबडे:
जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे विद्युत विभागाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे एका गरीब शेतकऱ्याची म्हैस करंट लागून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याने आपल्या म्हशींना चारा खाण्यासाठी शेत परिसरात सोडले होते. यावेळी विद्युत डीपीजवळील मोकळी व असुरक्षित विद्युत वायर म्हशीच्या संपर्कात आल्याने तिला जोरदार करंट लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शेतकऱ्याने संबंधित लाईनमनला सात ते आठ वेळा फोन करून माहिती दिली, मात्र वेळेवर कोणीही घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच मानव मित्र न्यूजची टीम घटनास्थळी दाखल झाली. टीमने विद्युत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना तातडीने घटनास्थळी बोलावले. त्यानंतर मृत म्हशीचा पंचनामा करण्यात आला. तसेच संबंधित गरीब शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
स्थानिक नागरिकांच्या मते, विद्युत डीपी व वायरची योग्य देखभाल केली असती तर ही घटना टळू शकली असती. आज एका मुक्या जनावराचा बळी गेला आहे, उद्या एखाद्या नागरिकाचा किंवा शेतकऱ्याचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्युत यंत्रणेतील निष्काळजीपणा, उघड्या वायर, धोकादायक डीपी आणि वेळेवर दखल न घेणारी व्यवस्था यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पीडित शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मानव मित्र न्यूजची मागणी :
मृत म्हशीची तात्काळ नुकसानभरपाई द्यावी.
संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी.
धोकादायक डीपी व मोकळ्या विद्युत वायर तातडीने दुरुस्त कराव्यात.
ग्रामीण भागातील विद्युत सुरक्षेची विशेष मोहीम राबवावी.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























