आळंदी देवाची (प्रतिनिधी सचिन.शिंदे)
आळंदी, दि. ११ ( भागवत एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र नगरी आळंदीत आज भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. माऊलींच्या नामस्मरणाने आणि विठ्ठलाच्या गजराने संपूर्ण अलंकापुरी नगरी दुमदुमून गेली.
एकादशीचे औचित्य साधून माऊलींचा गाभारा विविध रंगांच्या आकर्षक व सुगंधी फुलांनी सजविण्यात आला होता. या मनमोहक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती.
यावेळी आळंदी देवस्थान, स्वकाम सेवा मंडळ आणि लोढा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भाविकांसाठी साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सेवाकार्यात मनसुख लोढा, अशोक लोढा, किरण लोढा, महादेव पाखरे, धनाजी गावडे, चंद्रकांत तापकीर यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, इंद्रायणी आरती समितीच्या वतीने इंद्रायणी नदीच्या घाटावर महिलांनी सामूहिक महाआरती करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी दीप प्रज्वलित करून इंद्रायणी मातेची आरती केली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामस्मरणात घाट परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या महाआरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
याच दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सासवड येथे नागरिकांच्या वतीने भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. भागवत एकादशीच्या निमित्ताने आळंदीत दिवसभर धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांनी भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























