ठाणे दहीहंडी २०२५ उत्सव जल्लोषात
ठाणे : ठाणे शहरात दहीहंडीचा उत्साह मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ठाणे शहराला गोविंदांची पंढरी म्हणून ओळखले जाते आणि शहरातील मोठ्या दहीहंड्यांपैकी धर्मवीर आनंद दिघे यांची मानाची सोनेरी हंडी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीनं सुरू झालेली ही परंपरा आजही कायम ठेवली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाही या दहीहंडीला हजेरी लावली. शिंदे टेंभीनाक्यावर दाखल होताच डीजेवर “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” हे गाणं वाजलं आणि उपस्थितांनी जोरदार जल्लोष केला. हे गाणं लागल्यावर वातावरण आणखी रंगतदार झालं आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात दहीहंडीचा माहोल रंगून गेला.
सकाळपासूनच ठाणे, मुंबई व उपनगरांतील अनेक गोविंदा पथकांनी टेंभीनाक्यावर येऊन हंडीला सलामी दिली. ठिकठिकाणी मंडळांनी थर रचून मानाच्या हंडीला अभिवादन केले. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेते गोविंदा, अभिनेता शरद केळकर, संतोष जुबेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थित राहून जल्लोषात रंग भरले.
शहरभरात राजकीय नेत्यांकडून आणि विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाले. मात्र धर्मवीर आनंद दिघे यांची सोनेरी हंडी ही ठाण्यातील मानाची हंडी असल्याने हजारो भाविक व नागरिकांनी येथे मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यंदाची दहीहंडी परंपरेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उत्सवात राजकीय चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गोविंदांचा जल्लोष पाहायला मिळाला.
👉 ठाणेकरांसाठी दहीहंडी २०२५ हा उत्सव आनंद, श्रद्धा आणि परंपरेचा संगम ठरला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























