नोटिसा चार जणांना, खुलासे कुठे? नावे गुप्त ठेवण्यामागचे कारण काय, नागरिकांचा सवाल
आळंदी, दि. ४ (प्रतिनिधी सचिन शिंदे)संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील चोरी प्रकरणानंतर संस्थान प्रशासनाने चार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून लेखी खुलासे मागविले होते. त्यानंतर काहींवर निलंबन, सेवा समाप्ती आणि ताकीद स्वरूपाची कारवाई जाहीर करण्यात आली. मात्र संबंधितांची नावे, त्यांनी दिलेले वैयक्तिक खुलासे आणि कारवाईमागील नेमकी कारणे अद्यापही गुप्त ठेवण्यात आल्याने आळंदीत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या मते, प्रत्येक संबंधित व्यक्तीला स्वतंत्र नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येकाने दिलेला खुलासा वेगळा असणे स्वाभाविक आहे. मात्र विश्वस्त मंडळाने केवळ कारवाईची घोषणा केली, पण संबंधितांनी नेमके काय स्पष्टीकरण दिले, कोणाचा खुलासा ग्राह्य धरला गेला, कोणाचा फेटाळला गेला आणि त्यामागील कारणे काय होती, याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भाविकांच्या देणग्या आणि मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित गंभीर प्रकरणात संपूर्ण माहिती जनतेपासून दूर ठेवली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “जर सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडली असेल, तर संबंधितांची नावे आणि त्यांचे खुलासे जाहीर करण्यास अडचण काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणात संस्थान प्रशासनाने अधिक स्पष्ट भूमिका घेत सर्व तथ्ये जनतेसमोर मांडावीत, अन्यथा हा केवळ भोंगळ कारभार आहे की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, अशा चर्चांना आणखी खतपाणी मिळू शकते, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. . 
दरम्यान, चोरी प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून तपासातून सत्य का असत्य परिस्थिती समोर येणार आहे. मात्र तपासाला बाधा न आणता उपलब्ध प्रशासकीय माहिती, नोटिसा, खुलासे आणि कारवाईची कारणमीमांसा जाहीर केल्यास भाविकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























