मुंबई ( रविदास कदम ) महाराष्ट्राच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षण साकार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील लोकभवन येथे त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
लोकभवन येथे साधेपणाने पार पडलेल्या शपथविधी समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय व निमंत्रित मान्यवरही उपस्थित होते. 
शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. पक्षाच्या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला, तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यास अनुमोदन दिले.
सायंकाळी सुमारे पाच वाजता राजभवन येथे अवघ्या १२ मिनिटांत हा शपथविधी समारंभ पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक व वक्फ विकास ही खाती सोपवण्यात आली आहेत. मात्र, स्व. अजितदादा पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते यावेळी वगळण्यात आले आहे.
शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यातील जनतेचे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























