(पुणे प्रतिनिधी रविदास कदम
पुणे /१२ माचॅ २०२६ येरवडा परिसरातील एका शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 509 आणि 354 तसेच पोस्को कायदा कलम 11 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींचे वकील ॲड. किरण कदम यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद मांडला. त्यांनी सांगितले की, मुख्याध्यापक पदाच्या स्पर्धेत असलेल्या एका शिक्षकाने पीडित विद्यार्थिनी व तिच्या पालकांना खोटी फिर्याद दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले.
तसेच, मुख्याध्यापकांनी थकित शालेय फी भरण्यासाठी विद्यार्थिनीच्या पालकांकडे तगादा लावल्यामुळे, संबंधित शिक्षक व पालकांनी संगनमत करून उच्चशिक्षित मुख्याध्यापकाला खोट्या प्रकरणात अडकवले, असा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात ॲड. किरण कदम यांना ॲड. जगदीश सोनवणे आणि ॲड. निखिल खांदवे यांनी सहाय्य केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























