:
आळंदी.(रवि.कदम) ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सुरु असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी पत्रकार अर्जुन मेदनकर, आळंदी शहर शिवसेनेचे उपशहरप्रमुख माऊली घुंडरे पाटील तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे उपस्थित होत्या. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सेवा पंधरवडा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत विविध आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्याची संधी आहे. समाजाच्या सहभागातूनच आरोग्य चळवळींना गती मिळते.”
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा नियतीताई शिंदे यांनी सहकार्य केले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांच्या सोयीसाठी खुर्च्यांची कमतरता जाणवत होती. या निकडीची जाणीव ठेवून महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. श्री विलास तात्या बालवडकर यांनी रुग्णालयास तब्बल ३० खुर्च्यांची भेट दिली. या कार्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून रुग्णालय प्रशासन व उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सेवा पंधरवडा निमित्त रुग्णालयात विविध आरोग्य तपासण्या, जनजागृती मोहीम, सल्ला शिबिरे, तसेच रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
👉 या रक्तदान शिबिरामुळे आळंदी परिसरातील सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित झाली असून, रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























