पुणे | मानव मित्र (न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार)
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विरेंद्र शेटे यांची इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (आयईटीई), नवी दिल्लीच्या २०२६ ते २०२९ या कार्यकाळासाठी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून या सर्वोच्च राष्ट्रीय संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलवर निवड झालेल्या केवळ दोन प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश आहे.
शिक्षण, संशोधन, प्रशासकीय नेतृत्व आणि संस्थात्मक विकास क्षेत्रातील ३२ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या प्रा. डॉ. शेटे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नावावर १५० हून अधिक संशोधन निबंध, ३ पेटंट्स, ५ कॉपीराइट्स आणि ३ पुस्तके असून, त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक योगदान दिले आहे.
यापूर्वी त्यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य, शैक्षणिक परिषद सदस्य, परीक्षा मंडळ सदस्य, प्राचार्य, संचालक, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. उत्कृष्ट अध्यापन आणि विद्यार्थी विकासातील योगदानाबद्दल त्यांना ‘बेस्ट टीचर’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
आयईटीई पुणे केंद्राचे २०२२ ते २०२४ या कालावधीत अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय परिषद, झोनल सेमिनार, प्रकल्प स्पर्धा, महिला सक्षमीकरण उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यानंतर इमिजिएट पास्ट चेअरमन म्हणून कार्यरत असताना आयईटीई पुणे केंद्राला २०२६ चा ‘बेस्ट सेंटर अवॉर्ड’ प्राप्त झाला.
प्रा. डॉ. शेटे यांची गव्हर्निंग कौन्सिलवर झालेली निवड ही त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक कार्याची, संशोधनातील योगदानाची आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जात आहे. त्यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन आणि तांत्रिक नवोन्मेष क्षेत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल एमआयटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालिका डॉ. सुनीता कराड आणि कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी प्रा. डॉ. विरेंद्र शेटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय स्तरावर एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा शैक्षणिक व तांत्रिक ठसा अधिक भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम






















