पुरंदर /(प्रतिनिधी अशोक कुंभार)
गुरुवार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुरंदर तहसील कार्यालयासमोर दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व आंदोलन संघटनेच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
पुरंदर तालुक्यातील दिव्यांग नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भूमिहीन व बेघर दिव्यांग व्यक्तींना राहण्यासाठी किमान एक गुंठा जागा देण्यात यावी, तसेच हातांचे ठसे व डोळ्यांचे स्कॅन होत नसल्यामुळे आधार कार्डपासून वंचित राहिलेल्या दिव्यांग व्यक्तींची आधार नोंदणी व अपडेट तात्काळ करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच सर्व दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा, संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत प्रत्येक दिव्यांग महिला व पुरुषास दरमहा अडीच हजार रुपये पेन्शन मंजूर करण्यात यावी. संजय गांधी निराधार पेन्शन योजना समिती तात्काळ गठीत करण्यात यावी, तसेच आमदारांच्या अध्यक्षतेखालील पाच टक्के दिव्यांग निधी खर्च विनियोजन समिती त्वरित कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यानंतर दिव्यांगांच्या वतीने पुरंदर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे पदाधिकारी फिरोज वजीर पठाण व दत्तात्रय दगडे, सासवड शहर अध्यक्ष यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























