चाकण, पुणे : आयटी पार्क हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने नव्या मेट्रो मार्गाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याचं मार्गाची आणि त्यावरील प्रस्तावित स्टेशनची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली. या मेट्रो मार्गिकेवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील भक्ती शक्ती चौकातून या मार्गाची सुरुवात होणार आहे. तिथून मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसी मार्गे चाकण शहरापर्यंत पोहचेल. जवळपास 41 ते 42 किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग असेल. यात काही बदल अपेक्षित आहेत. त्याचं अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन, या विस्तारित मेट्रोवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. हिंजवडी आणि चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याचा विडा अजित पवारांनी उचलला आहे. त्यासाठी अजित पवारांनी प्रत्यक्ष पाहणी दौरे ही केलेत. याचाच भाग म्हणून हा विस्तारित मेट्रो मार्ग सत्यात उतरवला जाणार आहे. हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी आणि तळवडे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे.
अजित पवारांनी दिली बैठकीची सोशल मिडीयावर माहिती (Ajit Pawar X Post)
आज पुण्यातील मेट्रो कार्यालयात रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडी मेट्रो मार्ग एमएसआयडीसी एलिव्हेटेड रोडशी ओव्हरलॅप होत असल्याच्या विषयाबाबत व शहरातील मेट्रो लाइन विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मेट्रो लाईन विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी ओव्हरलॅपसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारित सूचना केल्या.
नव्या मेट्रो मार्गामुळे रोजची वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. औद्योगिक तसेच व्यापारी क्षेत्रांमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचून आर्थिक कार्यक्षमतेतही वाढ होईल. महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
मेट्रो मार्गामुळे फक्त वाहनांची कोंडी कमी होणार नाही, तर पर्यावरणालाही दिलासा मिळेल. रस्त्यांवरील अतिरिक्त वाहतूक कमी झाल्याने प्रदूषणात घट होईल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील नागरिकांसाठी मोठा बदल घडवून आणणार आहे. मात्र, प्रकल्पाची नेमकी सुरुवात आणि पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या मेट्रो प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असेही आवाहन

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























