घनसावंगी तिर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे
घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव शिवारात एका शेतकऱ्याची ७.५ एचपीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. आधीच नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला या चोरीमुळे मोठा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवणगाव येथील शेतकरी विकास भरत तौर आणि बाळासाहेब भरत तौर यांनी गोदावरी-गंगा पात्राजवळील शेतासाठी ७.५ एचपीची मोटार बसवली होती. रविवारी रात्री (दि. २२ जून) अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ही मोटार चोरून नेली.
आज सकाळी शेतकरी शेतावर पोहोचले असता मोटार जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करावी आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























