आळंदी (प्रतिनिधीरवि कदम,) गणेश विसर्जन काळात आळंदी नगर परिषदेच्या वतीने मूर्तीदान व नदी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत एकूण ७ हजार ५११ गणरायांचे विसर्जन मूर्तीदान केंद्रांमध्ये करण्यात आले.
या उपक्रमासाठी आळंदी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी असे ८० सेवक कार्यरत राहिले. तसेच आळंदी ग्रामस्थ, वारकरी, भाविक, गणेश मंडळांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी सक्रिय सहभाग दिला. मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी सांगितले की, विसर्जन काळात नगरपरिषदेकडून निर्माल्य संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्रांतून सुमारे ४ टन निर्माल्य नदीत जाण्यापासून रोखण्यात आले, ज्यापासून पुढे सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.
तसेच आळंदीत संकलित झालेल्या मूर्ती श्री बालाजी फाउंडेशन, बालेवाडी यांच्या मार्फत शास्त्रोक्त पद्धतीने विरघळवून त्यापासून विविध कलाकृती तयार होणार असून उरलेली माती वृक्ष संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.
या उपक्रमात दोन दिवस एमआयटी महाविद्यालयाच्या NSS विभागातील ७० विद्यार्थी सहभागी झाले. तसेच सामाजिक बांधिलकीतून शहर शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने मूर्ती विसर्जन कुंड ठेवण्यात आले. मूर्तीदान स्वीकारून नगरपरिषदे कडे मूर्ती सुपूर्द करण्याचे कार्य उपशहर प्रमुख माऊली घुंडरे पाटील व शाखा प्रमुख रोहिदास कदम विनायक महामुनी सुयश कदम विशाल तापकीर नितीन ननवरे यांच्या माध्यमातून पार पडले.
यासोबतच सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने, नियमांचे पालन करत आणि जल्लोषात विसर्जन केले. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात संपन्न झाले.
मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागला असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























